टिपरी नाच

Tipari Nach

सुसंगीत नृत्य कला पथक
मौजे मूर्तवडे कातळवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी

टिपरी नाच हा पूर्वापार चालत आलेल्या नाचपैकी एक. गौरी गणपती अन दसऱ्याच्या काळात मनोरंजन म्हणून १०-१२ स्त्रिया एकत्र येऊन गौरीगणेशाची अन देवी देवतांची आराधना करण्यासाठी जागरणाच्या रूपात हा नाच करीत , या नाचासाठी विशिष्ट असा पोषाख नाही कारण त्यावेळेस स्त्रिया उपलब्ध अंगवस्त्र परिधान करून हा नाच करीत असत जसे परकर (स्कर्ट) ,शर्ट , ब्लॉऊस, साडी , ९ वारी साडी , लुगडं इत्यादी.

लहानपणापासून आम्हास सुद्धा या नाचाची गोडी लागली, लहानपणी आम्ही ५-६ मुलींना सोबत घेऊन हा नाच करायचो अन या नाचासाठी पुढाकार घेण्यासाठी पुढे म्हणजे लीला अन प्रमिला या दोन गायिका. कारण लीला ला पूर्वापार चालत आलेली सर्व गाणी माहित असायची तर त्या गाण्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रमिला सोबतीला नेहमी असायची. तदनंतर आपापसातील वैयक्तिक समस्येमुळे १-२ वर्षासाठी नाच मात्र बंद होता. ४-५ मुली असल्या तरच नाच व्हायचा.

पुढे २०१२ साली अक्षय – प्रमिला यांनी गीतांजली , प्रियांका , रश्मीता, प्रियांका , प्रतीक्षा यांच्या साहाय्याने पुन्हा नाचमंडळाची स्थापना केली. त्यात पुढे अंजली अन दीपिका सुद्धा सामील झाल्या. सुरुवातीला मुलींपैकी कुणास जुनी गाणी जास्त अवगत नसल्याने आम्ही फक्त भावकीतच नाच करू लागलो सुरुवातीला आम्ही स्वखर्चातून एकाच रंगाच्या साड्या घेऊन नाचाला सुरुवात तर केली २०१३ साली आम्ही वेगवेगळ्या रंगाच्या ९ वारी साड्या नेसून गणेशोत्सवादरम्यान पहिला आगळा वेगळा नाच केला तो खत्तर गल्ली येथे सार्वजनिक गणपती च्या आवारात. पुढे हा आमचा प्रवास असाच चालू होता त्यावेळीस नाचमंडळाला विशिष्ट नाव हि नाही अन ओळखही नाही सऱ्यांना जाणून होत ते फक्त एक नाव “नेवरेकर बंधू महिला नाच मंडळ” कारण सुरुवातीला तर आम्ही ह्याच नावाने नाच सुरु केला.

त्यानंतर सर्वानुमते एक साजेस नाव मंडळास सुचविण्यात आलं ते म्हणजे “सुसंगीत नृत्य कलापथक”

आणि मग नावाप्रमाणेच काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून अन टिपरी नाचाची परंपरा जपण्यासाठी पारंपारिकतेचे भान राखून टिपरी नाचात प्रथमच आम्ही मराठमोळी ९ वारी नेसून टिपरी नृत्याची लोककला संवर्धनाची पताका हाती घेतली अन पहिल्याच वर्षी रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सुरुवातीला फक्त गाव पातळीवर नाच करता करता आता पंचक्रोशीसह , चिपळूण तालुका अन रत्नागिरी – गुहागर जिल्हा टिपरी नृत्याने गाजवूनच सोडला.

म्हत्वाच म्हणजे आमच्या नृत्यांगना, नाच म्हटलं कि एका पायावर कुठेही नाच करण्यास तत्पर मग त्यास काळ वेळ काही नाही अन तहान भूक तर लांबच अगदी गणेशोत्सवादरम्यान स्वतःला झोकून नाच करीत. अंजली, गीतांजली , प्रमिला , प्रियांका , रश्मीता यांसारख्या गायिका अन प्रतीक्षा ,प्रियांका, दीपिका, शालिनी, अर्चना , नेहा , दीक्षा , तनुजा यांसारख्या उत्कृष्ट नृत्यांगना अन त्यांना साथ म्हणून मा. सुधाकर सह कु. सतीश यांचं पार्श्वसंगीत  अन दरवर्षी काहीतरी नवीन द्यावे या विचाराचे कु अक्षय यांचं योगदान मोलाचं ठरलं त्यात मार्गदर्शक म्हणून सुरेंद्र , महेश , अजय , सूचित , आदित्य , सुशील , संदेश हे आमच्या यशामागील लपलेले महामेरू.

पारंपरिकता जपत आम्ही या नाचात काही फेरबद्दलही केला पण त्यामुळे या कलेला कलंक लागणार नाही याची काळजीसुद्धा घेतली. एखाद्या सुपारी नंतर प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद यामुळे वर्षानुवर्षे आमचं मनोबल वाढतच राहील आणि आजतागायत आम्ही हि कला जपण्यात यशस्वी ठरलो

आजही काहीजण आम्ही नाच करतो म्हणून आमची थट्टा मस्करी करतात पण त्यावर लक्ष न देता पुढे चालत राहण्याचं सामर्थ्य आम्हास मिळत ते रसिकप्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे.

प्रस्तावना

पारंपरिक सुमधुर सोज्वळ टिपरी नाच

नाचामध्ये नाचताना हातात टिपरी असणे गरजेचे आहे तसेच ह्यात लेझीम सुद्धा वापरले जाते आणि वाद्यांमध्ये टाळ मृदूंग झांज ढोलकी यांचा समावेश असावा लागतो .

पारंपरिक टिपरी नाच हा गौरी गणेशाची आराधना यासाठी केला जातो म्हणून यात सुसंस्कृत सोज्वळ गीतरचना असणे गरजेचे आहे .

टिपरी नाचाची कला हि आजवर सुमधुर सोज्वळ आराधनेच्या बळावर श्रेष्ठ ठरलेली कला आहे कारण आजवर या कलेला अश्लीलतेचा कलंक लागला नाही आणि यापुढेही लागणार नाही याची दक्षता हौशी कलाकारांनी घ्यावी तसेच हि कला अशीच वर्षानुवर्षे अविरत चालू राहण्यासाठी तसेच या कलेत सोज्वळ सौदर्यरूपी नावीन्य येत राहावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहून हा टिपरी नाचाचा वारसा पुढील पिढीस प्रदान करावा आणि या कलेच्या विकासासाठी अधिकाधिक मुलामुलींना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे .

एखाद्याला कमीपणा दाखविण्यासाठी नानारूपी शास्त्राच्या नावाखाली अश्लील शब्द जोडून काव्य रचना करू नये . या कलेमध्ये स्वतःला श्रेष्ठ दाखविण्याचा प्रयत्नच करू नये हि नम्र विंनंती 

जरकधी ह्या नाचमध्ये स्पर्धा झाली तर त्यामधील गीतरचना हि पूर्णतः सुसंकृत सोज्वळ असावी . यामध्ये भक्तिभाव , प्रेम हर्षानंद , शौर्य ,प्रबोधन , उत्साह सुख दुःख अशा विचारसरणीचा भाव असावा आपल्या सुमधुर काव्य रचनेच्या माध्यमावर रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांसकडून शाबासकीची थाप मिळविणे हाच ध्यास असावा

आम्ही सुसंगीत नृत्य कलापथक मौ मूर्तवडे कातळवाडी , ता चिपळूण ,जी रत्नागिरी अशी प्रतिज्ञा करतो कि टिपरी नाचाची हि कला आम्ही रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहून या कलेस कोणताही कलंक लागणार नाही याचे भान राखून रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाखातर वर्षानुवर्षे आम्ही सारे कार्यरत राहू.