बहुरंगी नमन

Title of the document वंदितो रंगभूमी ,वंदितो रंगकर्मी

कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन

कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन अशा या लोककलेच्या प्रकारात प्रामुख्याने संगीत , नृत्य सहित फार्स , वघनाट्य यांचा समावेश होतो. परंपरागत चालत आलेल्या या खेळ्यांच्या प्रवासाची सुरुवात होळीच्या दरम्यान ग्रामदैवताच्या सहाणेवर पहिली मानाची थाप मारूनच होते. पायघोळ झगे , उपरणी , डोक्यावर पगड्या, अंगावर रंगीबेरंगी शाली अन हातात टाळ हा खेळ्यांचा मूळ पोषाख. असे १०-१२ खेळे अन त्यांसोबत एक मृदूंग वादक , संखासूर अन एक पुरुष स्त्री वस्त्र परिधान करून कोळिणीच्या रूपात टाळ – मृदूंगाच्या ठोक्यावर शंखासुरासहित ताल धरून नाचत असतात. पारंपरिक खेळ्यांत आपल्याला लाकडाची सोंगे पाहावयास मिळतात जसे गणपती , नटवा, नंदीबैल (घुंगुरपाडा) ,हरमाल (घोरपड), सांबर , वाघ , रंपा इ.

नमनाची सुरुवात हि खेळ्यांपासून होते, खेळे गायनातून विविध देवतांची आराधना करतात त्यानंतर संखासूर नृत्य अन मग गणेशाची आराधना होते. पुढे कृष्ण संवंगड्यांसह गवळणी अन मावशी सोबत थट्टा मस्करी मनोरंजन होत रासलीला दाखवीत कृष्णाच्या ८ अवतारासह नमनाचा पहिला भाग संपतो , नंतर लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य करणारे हास्यकल्लोळासहित काळजाचा ठोका चुकविणारे फार्स नाट्यकृती सादर करीत नमनाचा दुसरा टप्पा संपतो. त्यानंतर काल्पनिक , पौराणिक , ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वघनाट्य सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे कोकणात जर रात्री ९ .०० वाजता नमन सुरु झालं तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडा आरवेपर्यंत म्हणजेच ५ ते ५.३० वाजेपर्यंत चालत आणि संपूर्ण कार्यक्रम पाहिल्याशिवाय एकही रसिकप्रेक्षक आपली जागा सोडत नाही आणि हे फक्त कोकणातील रसिकच अनुभवू शकतो यात तिळमात्र शंका नसावी.

नव जवान बाळ कला मित्र मंडळ

लहानपणापासूनच आम्हा साऱ्यांना खेळाची अन कलेची आवड. त्यात प्रत्येकाच्या घरच वातावरण सुद्धा कलेला साजेस होत त्यामुळे आम्हांवरही त्यांचाच प्रभाव. त्याकाळात कोकणातील बहुरंगी नमन हा प्रकार आमच्या गावी पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध होता. आम्हासही नमनाची खूप आवड. लहानपणापासूनच आम्ही नमनामध्ये छोटे छोटे पात्र करू लागलो. त्यावेळेस गावी सत्यनारायण पूजेनिमित्त मनोरंजन म्हणून हमखास होणार कार्यक्रम म्हणजे गावचे नमन. गावातील जेष्ठ लोक गोलाकार झगे, डोक्यात फेटा, हातात टाळ, गळ्यात दुड आणि रंगीबेरंगी शाली घालून खेळे व्हायचे असे गावातील १० ते १२ जण खेळे आणि एक मृदूंग वादक सोबत शंखासूर , एक थेर आणि एक पुरुष साडी नेसून त्यांसोबत नाचायला कोळीण म्हणून असायचा सोबत पारंपरिक लाकडी सोंगे असायची गणपती , नटवा , सांबर , घुंगुरपाडा , वाघ, हरमाली इ. आणि गावातील हौशी लोक सोंगाडे असायचे शिवाय तरुण मुले नऊवारी साडी नेसून डोक्यात केसांचा टोप, वेणी फणी करून गवळणी व्हायच्या आणि अशाप्रकारे रंगायचे नमन.

असे करता करता आम्ही सुद्धा छोटे छोटे पात्र करू लागलो त्यात साथ म्हणून श्री सखाराम ल नेवरेकर म्हणजेच सर्वांचे (अण्णा) वयाच्या ११ व्या वर्षापासूनच छोटी छोटी काल्पनिक वघनाट्य लिहू लागले , गाणी रचू लागले आणि लोकांनाही ती आवडायला लागली. तदनंतर अशाच गावातील १० – १२ हौशी मुलांना सोबत घेऊन अण्णांनी नमन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही जण नोकरी धंद्याकरिता मुंबईत स्थलांतर झाले परंतु नमनाची हौस त्यांना काही शांत बसूच देईना. आम्ही गावच्या अंगणात नाचणारी पोरं, शिमग्यात गावदेवीच्या सहाणेवर , कुणाच्या घरी पूजा असल्यास तिथेही आपल्यातील कलागुण दाखविणारी आम्ही पोरं. पण याच पोरांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्याकडून हवं ते साध्य करून घेणारा आमचा पक्या म्हणजेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सखाराम लक्ष्मण नेवरेकर. आमची कला गावच्या अंगणापुरती मर्यादित न राहता आज तुम्हा साऱ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली याचे सारे श्रेय जाते ते म्हणजे श्री सखाराम नेवरेकर यांनाच. अण्णांच्या सानिध्यात आम्ही साऱ्यांनी मुंबई रंगमंचावर नमन प्रयोग करावयाचे ठरवले. परंतु नमन उभं करावयाचं म्हटलं कि लागणार साहित्य अन पुरेशी भांडवल आमच्याजवळ तर नव्हतीच पण प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही थोडे थोडे पैसे जमा करून १९९५ साली ” नव जवान बाळ कला मित्र मंडळ ” स्थापन करून एका छताखाली एकत्र येऊन १९९७ साली मुंबईतील साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नीरोड येथे पहिला प्रयोग केला. परंतु गावातील आमच्या विरोधात असलेल्या लोकांनी आमचा हुर्यो उडवला आमचा पहिला प्रयोग मात्र अपयशी ठरला पण आम्ही नवजवान हरणारे नव्हतोच पुन्हा जोमाने चांगली तयारी करून २००० साली पुन्हा त्याच मुंबई रंगमंचावर प्रयोग केला अन या प्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त लाभल्याने यशास्वी प्रयोग आणि ध्यानी मनी बाळगलेलं स्वप्न मात्र पूर्ण झालं नंतर आम्ही मागे कधी फिरलोच नाही . प्रत्येक वर्षी मुंबईत एक प्रयोग करून गावी छोट्या मोठ्या सुपाऱ्या घेऊन आम्ही नावलौकिक मिळविला आणि नमन कलेत नावाजवानांची एक वेगळीच ओळख निर्माण केली.

वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेली पुरुष पात्री गवळण सादर करता करता १५ जानेवारी २०१७ रोजी प्रथमच स्त्री पात्री गवळण सादर करीत रसिक प्रेक्षकांची मन जिकून यशस्वी प्रयोग करून मुंबईतील साहित्य संघ रंगमंच हाउसफुल्ल नव्हे तर ओव्हरफूल करून सोडला. मंडळातील सारे कलाकार हौशी अन जिद्दी असल्याने दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून आजवर नवजवानांनी यशोगाथेचा नावलौकिक मिळविला. २०२० हे वर्ष हे मंडळाचे २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष यानिमित्त नवजवानांनी हा सोहळा दैदिप्यमान करण्यागत दमदार आयोजनासहित पार पाडला. मात्र यात कै. संतोष नेवरेकर (धाऱ्या) आणि कै. सुरेश कारकर (भाग्या) यांची चणचण भासलीच.

आज ग्रामदैवत वाघजाई देवीच्या कृपेने , श्री गजानन आणि श्री हनुमंतरायाच्या आशीर्वादाने रजिस्टर मंडळासहित हौशी आणि अवलिया कलाकारांमुळे नवजवानांची हि भरभराटी होत असून कोकणातील नमन क्षेत्रात ” नवजवान बाळ कला मित्र मंडळ ” हे हौशी नमन मंडळ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे ते केवळ साऱ्या कलाकारांतील एकता, नम्रता आणि जिद्द ह्यामुळेच.