आरती संग्रह

Aarti Sangraha

कोकणातील गणेशोत्सव

कोकण म्हटलं कि निसर्ग सौदर्याने नटलेलं अन दऱ्या खोऱ्यासह धरतीच्या कुशीत वसलेलं नंदनवन , अशा या कोकणात लोककलेसहित सण सुद्धा तितक्याच नित्यनेमाने पारंपरिक रूढी परंपरा सांभाळत मनोभावे एकोप्याने मोठ्या जल्लोष अन उत्साहात साजरे केले जातात, जसे देवदिवाळी , शिमगा (होळी) गणेशोत्सव इ.

सर्वपरिचयाचे म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा परंतु कोकणी चाकरमान्यांच्या बाबतीत फार उलट आहे, कोकणी माणसाच्या जीवनातील मूलभूत गरजा ह्या सहा असं म्हटलं तरी काही हरकत नाही, अन्न वस्त्र निवारा सहित देवदिवाळीची सुट्टी, शिमग्याची सुट्टी अन गणपतीची सुट्टी ह्या मूलभूत गरजा.

कोकणी चाकरमानी कामधंद्याकरिता जगाच्या पाठीवर कुठेही असो पण प्रत्येक सणाला तो त्याच्या मायभूमीवर परततोच मग परिस्थिती काही असो, देवदिवाळी अन शिमगा याप्रमाणेच गणेशोत्सव हा कोकणी माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंददायी सण.

नोकरीधंद्याकरिता गावाहून मुंबईत स्थलांतरित झालेला हा कोकणी चाकरमनी गणेशोत्सवासाठी आतुरच असतो. अन आपल्या लाडक्या राजाच्या आगमनासाठी समस्थ कुटुंबासह गावी पोहोचतो. गणेशोत्सवादरम्यान होणारा हा मुंबई ते गाव प्रवास कोकणी माणसाच्या आयुष्यातील सर्वात खडतर प्रवास कारण पावसाचे दिवस असल्या कारणाने नद्या ,नाले भरून वाहतुकीचे रस्ते ठप्प होतात तर घाटात दरड कोसळून एस. टी. महामंडळाची कोंडी होते. रेल्वे रुळावर पाणी साचणे , डोंगर कोसळणे , नद्यांवरील पूल कोसळणे , रस्त्यांना दारार येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात रेल्वे तिकीट न मिळाल्याने भरगच्च गर्दीचा रेल्वे प्रवास तर या चाकरमान्यांच्या पाचवीलाच पुजलेला.

परंतु कोकणी माणसाचा एकोपा इतका कि या उत्सवांदरम्यान काही जण एकत्र येऊन गावी जाण्यासाठी जादा गाड्या सोडतात तितकाच काय तो आराम म्हणावा तर त्यालाही कुणाची नजर लागते कारण या जादा गाड्या सुद्धा गावी वेळेवर पोहोचत नाहीत, कारण जास्त जादा गाड्या सोडल्याने रस्त्यावर ट्रॅफिक ची कोंडी अन अशा या समस्येच्या कचाट्यात अडकलेला आमचा कोकणी माणूस कधी कधी २४ तासाचा प्रवास करून गावी पोहोचतो अशाप्रकारची अनेक आणि कितीही संकटे आली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी पोहोचतोच आपल्या राजाच्या आगमनासाठी.

काही म्हणा एका दिवसात मुंबई रिकामी करण्याचे सामर्थ्य फक्त कोकणी माणसातच आहे आणि ते दृश्य गणेशोत्सवादरम्यान पाहावयास मिळतेच यात तिळमात्र शंका नसावी.

कोकणातील गणेशोत्सवाची एक वेगळीच शान असते कारण पावसाचे दिवस असल्याकारणाने धरतीने हिरवी शाल पांघरलेली असते सर्वत्र धबधबे अन त्या आवारातील नयनरम्य दृश्य पाहावयास मिळते संपूर्ण कोकण निसर्गरम्य वातावरणाने नटलेलं असतं. जिथे पाहावं तिथे फक्त हिरवळ अन चाकरमान्यांच्या येण्यानं सर्वत्र माणसांची रेलचेल चालू असते .

कोकणात प्रत्येकाच्या घरी गणपती असल्याने आरती म्हणा , तर कुणाकडे सत्यनारायणाची महापूजा म्हणा अथवा कुठे टिपरी नाच , जाकडी अन विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असणारच हे तथ्य.

कोकणातील गणेशोत्सवाबद्दल व्यक्त व्हावं म्हटलं कि वेळ अपुरा पडेल अन लिहावं म्हटलं तर एक महाग्रंथ सुद्धा बनेल …………………………..असा असतो कोकणातील गणेशोत्सव ……………….

आमच्या बद्दल

आरती संग्रह म्हटलं कि आठवतं ते गणेशोत्सवादरम्यान नैवेद्य म्हणून आणलेल्या मोदकाच्या खोक्यातील छोटस आरत्यांचं पुस्तक, पण नेवरेकर बंधू आरती संग्रहाची लिलयाच न्यारी. इथं प्रत्येकाच्या घरी गणेशाचं झालेलं असतंच त्यात घरोघरी जाऊन आरत्या म्हणण्याची मज्जाच काही वेगळी.

आरती संग्रहाची स्थापना म्हणाल तर तसं काही नाही कारण सातत्याने कर्तव्यदक्षता बाळगत एका छोट्याशा संघटित लोकांच्या एकोप्याला तसं नावचं पडलं “नेवरेकर बंधू आरती संग्रह” अन पाहता पाहता कधी वटवृक्षासमान या आरती संग्रहाची निर्मिती झाली कळलंच नाही.

पूर्वीच्या काळात वाडीत जास्त घरे सुद्धा नव्हती कारण त्यावेळेस सर्व जण एकछताखाली सहकुटुंब सहपरिवार गुण्यागोविंदाने राहायचे म्हणून वाडीत गणपती सुद्धा कमीच, अन घरोघरी जाऊन सायंकाळच्या एका वेळेची आरती म्हणायला सुद्धा कमी मंडळी असायची. अन आता मात्र सर दृश्यच बदललय कारण आता वाडीत घर सुद्धा जास्त अन आरती म्हणायला मंडळीसुद्धा जास्त. महत्वाचं म्हणजे सोनू बुवांच्या अध्यक्षतेखाली (सखाराम) अण्णांनी सहकाऱ्यांसोबत एक वेगळीच चळवळ सुरु केली ती म्हणजे घरोघरी आरती म्हणायला घरातील प्रत्येकाने यायलाच पाहिजे मग त्यात लहान-मोठी मुलं मुली , तरुण – वयस्कर सुद्धा त्यात स्वइच्छेने येऊ लागले , वयोवृद्ध आरतीला आल्याने त्यांच्या काळातील मोठं मोठ्या आरत्या आणि उडते गजर म्हणायला साऱ्यांमध्ये एक वेगळंच चैतन्य भ्ररून यायचं.

पुढे मग अण्णांनी सोनू बुवांना अन सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन आरतीसंग्रहासाठी सदरे घेण्याचा विचार केला आणि त्यास सर्वांची मान्यता मिळवून ते प्रत्ययात सुद्धा आणलं. सर्वांसाठी सदरे मिळणार अन आरतीला एकच रंगाच्या सदऱ्यांमध्ये घरोघरी जाऊन आरत्या म्हणणं हे विचारच काही वाखाणण्याजोगे. घरोघरी प्रत्येकाला सादरे मिळाले मग त्यात मुलींना सुद्धा सदरेच होते आणि आरतीसंग्रहाचा एक नियमच बनवला कि घरी जेवण बनवायला फक्त घरणीच (गृहिणी) राहील बाकी कुणालाही घरी राहावयास मिळणार नाही प्रत्येकाने आरतीला यायलाच हवं.

सोनू बुवांच्या पूर्वापार चालत आलेल्या आरत्यांसह अण्णांनी नवनवीन चालींवर नवीन आरत्या आणल्या आणि त्या आरत्या म्हणायला लहान थोर सर्वांआधी पुढे असायचे. कारण अण्णांच्या आरत्या अन चाली या अप्रतिमच.

तसं गावात पूर्वीपासूनच घरोघरी जाऊन आरती म्हणायची प्रथा होती यात काही वाद नाही पण आमच्या आरती संग्रहाच जरा वेगळंच होत. पण सर्वजण एकाच रंगाचा सदरा घालून आरतीला जाणं हा विचारच काही वेगळा होता आणि याचा उत्तम प्रतिसाद म्हणजे एकाच वेळी आरतीला फक्त दहा बारा नव्हे तर तब्ब्ल जवळपास ४०-५० जणं उपस्थित असायचे. त्यात सदऱ्याची एक गम्मत म्हणजे सुरुवातीला अंदाजे साईझ चे सादरे आणल्याने कोणालाही बरोबर होत नव्हते प्रत्येकाला ढगळे व्हायचे काही सादरे इतके मोठो कि सदऱ्याखाली पायजमा घातलाय कि नाही हाच प्रश्न पडायचा अन यात खरी गम्मत म्हणजे लहान मुलं मुली अन हडकुल्याने जर सादर घातला तर असं वाटायचं कि जणू दोरीवर सदरा वाळत घातलाय एवढं सारं हास्यास्पद असूनही प्रत्येक जणं सदरा घालूनच आरतीला यायचा कारण तसा नियमच अन सदरा न घातलेला व्यक्ती जणू दुसऱ्या ग्रहावरचाच.

आमच्या आरत्या दिवसातून दोन वेळ सकाळ अन संध्याकाळ. आमच्या आरतीची सुरुवात हि अण्णांच्या घरापासून ते शेवट सोनू बुवांच्या घरी. जर सकाळची आरती १० .०० वाजता सुरु झाली तर सर्व घर होईपर्यंत २.३० वाजायचे अन संध्याकाळी आरतीची सुरुवात ६ .०० वाजता झाली तर मग रात्रीचे १२.३० किंवा १ सुद्धा वाजायचे. मग त्यात पावसाची नाळ कोसळो अथवा गावातील लाईट जावो अंधारात का होईन आरतीला जाणं गरजेचच, त्यात लहान मुलं सुद्धा शेवटपर्यंत असायची, कधी कधी भर पावसात छत्री घेऊन तो सदरा घालून बाहेर पडायला कितीही नाकी नऊ आले तरी हे आरतीवाले नेवरेकर त्यांच्या वेळेवर आरतीला हजर ह्यांना ना घरी बसवेनाच उठसूट निघाले आरतीला. इतके गणेशभक्तीत वेडे आहेत सारे. पण काही म्हणा आरतीसंग्रहाची बातच निराळी.

आरती म्हणायला एकाच घरत ज्यावेळेस ४० -५० जणं शिरतात तेव्हाच दृश्यच काही वेगळं अन त्यात अण्णांच्या आरतीसह सोनूबुवांच्या आरत्या अन गजर एका जागी बसू देईनाच. आरतीसंग्रहाची एक मज्जा होती ती म्हणजे प्रसाद खायची कारण प्रत्येक घरी प्रसाद हा पूर्णपणे वेगळा तसं म्हणाल तर फळ आणि काजूगोळे याना तर आमची पोर हातच लावत नाहीत फक्त एक उचलून बाजूला होतात. त्यांना प्रसाद म्हणजे मोदक लाडू , काजू, बदाम, ढोकळा ,इडली ,वडापाव ,सामोसा ,कांदा भजी , कांदेपोहे , शिरा , उपमा , फालुदा , थंड पेय आणि असे अनेक पदार्थच पाहिजे आणि साऱ्यांपैकी सकाळ संध्याकाळ आरतीसंग्रहाच्या एकूण ३०-३५ घरांपैकी कुठेना कुठे तरी या पदार्थाचा बेत असतोच अन याची बातमी सर्वप्रथम लहान बाळ गोपाळांना सर्वप्रथम लागतेच , अन एवढा सर्व प्रसाद भक्षण करून एकही बालगोपाळ गणेशोत्सवादरम्यान एकही दिवस घरी जेवत नाही आरतीला कितीही वेळ होवो इथं मात्र कुणीही थकत नाही त्यात तो सदरा सात दिवस रोज आरतीवरून घरी गेल्यावर वाळत घालावा लागायचा सर्व काही वेगळंच.

खरी मज्जा तर तेव्हा यायची जेव्हा दोन घरातुन अंतर लांब असलं कि काही जण खिसे भरून प्रसाद घ्यायचे अन चालता चालता प्रसाद संपवायचे पण यात त्या सदऱ्याची नासधूस करून टाकत पण पुन्हा दुसऱ्यादिवशी तोच सदरा.

आरती म्हणायची आमची जरा वेगळीच पद्धत प्रत्येक आरतीची चाल वेगळी त्या चालींवर पाऊले थिरकण्याची पद्धत सुद्धा वेगळी अन त्यात सोनू बुवांचा नाच हातवारे त्याला साथ म्हणून यशवंत बाबा टाळ अन देवजी बाबा झांज घेऊन जो काय धुमाकूळ घालायचे त्याला शब्दच नाही . त्यांना पाहून इतर साऱ्या मंडळीला हि जोश आला कि अण्णा नवीन गजर आणून धुडगूस घालत अशा प्रकारे प्रत्येक घरी २ आरत्या २ वेळेस हे चालतच राहील.

अण्णांच्या आरत्या इतक्या कर्णमधुर आणि ४०-५० जणांच्या ताफ्यात निघालेलं हे आरती संग्रह फक्त नवरेकरांची घर नव्हे तर , इतर काही जण सुद्धा आम्हास त्यांच्या घरी आरतीला बोलवू लागले मंडळी विचार करा कि एकाच वेळेस आरतीला एका घरी जर ४०-५० जण शिरले तर ते दृश्य काय असेल , अन ज्यावेळेस आरतीला बाहेर पडायचे सर्व तेव्हा इतकी भली मोठी रांग लागायची कि एका लग्नाचं वऱ्हाडच आलं असं वाटायचं , कुणाचं घर कितीही छोटं असलं तरी अर्धे घरामध्ये अन अधे घराबाहेरून आरती म्हणायचे अन  प्रत्येकाच्या हातात टाळ चीपळी असायचीच अन जो काय आरतीला या साऱ्यांचा नाद व्हायचा त्यानं सारं आसमंतर दुमदुमत राहायचं .

असं हे आमचं “नेवरेकर बंधू आरती संग्रह”